किनवट/प्रतिनिधी: अनिल महामुने यांच्याकडे आज किनवट गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला. त्यांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालय पदभार स्वीकारल्यानंतर अनेक शिक्षक व स्थानिक मान्यवरांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
महामुने हे शिक्षण क्षेत्रात अनुभवी अधिकारी असून यापूर्वी देखील गटशिक्षणाधिकारी म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. सध्या किनवट तालुक्यात अनेक प्रशासकीय अधिकारी प्रभारी कार्यरत आहेत अशा स्थितीत अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती ही अत्यंत सकारात्मक मानली जात आहे. विशेषतः शैक्षणिक क्षेत्राच्या सुरुवातीस जबाबदारी त्यांच्याकडे दिल्यामुळे नियोजन, प्रवेश प्रक्रिया व शाळांची पूर्वतयारी सुरळीत पार पाडण्यात मदत होणार आहे.
नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर बिरगे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. पदभार स्वीकारल्यानंतर महामुने यांनी शिक्षकांचे सहकार्य आणि आधीचा अनुभव या बळावर शैक्षणिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व अधिकारी उपस्थित होते.