नायगाव (बा ) जिल्हा परिषदेच्या,नगरपालीका व महानगरपालीकेच्या शाळा पुरेशी विद्यार्थीसंख्या नसल्यामुळे डबघाईला आल्या असून सरकार समुह शाळा असाव्यात या विचारात आहे पण त्याऐवजी या शाळेमध्ये भौतिक सुविधा पुरवून शिक्षकाचे अशैक्षणिक कार्य कमी करून या शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यात उच्चशिक्षणामध्ये आणि सर्व प्रकारच्या नोकरीमध्ये 50% आरक्षण देण्याची घोषणा करावी ज्यामुळे सरकारी शाळांना विद्यार्थी संख्या कधीच कमी पडत नाही असे प्रतिपादन प्रा डॉ शंकर गड्डमवार यांनी आपल्या पाल्याना इंग्रजी माध्यम शाळेतून काढून जिल्हा परिषद नायगाव कॅम्प या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश देताना केले आहे यावेळी मुख्याद्यापक शिवराज साधू व सर्व शिक्षक उपस्थित होते
सर्वच सरकारी शाळा ह्या गोरगरीब व मध्यमर्गीय जनतेच्या विद्यावाहिनी आहेत पण इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ एवढे वाढले आहे की, प्रत्येक गावामध्ये आणि शहराच्या गल्लीबोळामध्ये शाळा सुरु करून व्यवसाय सुरु केलेला आहे. या शाळेतील कपडयाचा, बुटाचा, टायबेल्टचा टापटिपपणा पाहुन आणि इंग्रजीतून बडबड गीते ऐकून प्रत्येक पालकाला माझा पाल्य कलेक्टरच होतो की काय असा आभास होत आहे पण उलट नोकरीसाठी घेण्यात आलेल्या सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये मराठीतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थांचाच वरचष्मा राहीलेला आहे. आता महाराष्ट्रात सरकारी शाळामध्येही सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात आला आहे आणि एमपीएससी व यूपीएससीसह सर्वच परीक्षा ह्या मराठी माध्यमातून देण्याची तरतूद करण्यात आली आहे तसेच मातृभाषेतून जेवढ्या ओघळत्या स्वरुपात विद्यार्थी आपले मत मांडू शकते तेवढ्या प्रमाणात इतर कोणत्याही भाषेतून मांडू शकत नाही. या शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षण व नोकरीमध्ये 50% आरक्षण दिल्यास मराठी माध्यम शाळेची खूप मोठी प्रगती होऊ शकते. या बाबीकडे मराठी भाषेचा उदोउदो करणाऱ्या राजकीय पक्षानी सरकार दरबारी हा विषय प्रकटपणे मांडल्यास मराठी माणसाला खूप मोठया प्रमाणामध्ये न्याय मिळेल असे डॉ गड्डमवार यांनी आपल्या भावना मांडल्या. यावेळी शाळेतील शिक्षिका सौ राहिणी वट्टमवार, सौ. पिंकी हुंडेकर, श्री. संतोष कल्याण,प्रणिता मुंडकर आणि वारणेचा वाघ या साप्ताहिक वृतपत्राचे संपादक सुभाष शंकपाळे व दिव्यमुखेड नगरीचे संपादक बालाजी नुरुंदे यांची उपस्थिती होती.