Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र विषयाची परीक्षा आज 109 केंद्रांवर शांततेत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडली

 


नांदेड : जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र विषयाची परीक्षा आज 109 केंद्रांवर शांततेत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडली. एकूण 21,937 परीक्षार्थ्यांपैकी 21,550 विद्यार्थी उपस्थित राहिले असून 98.24 टक्के उपस्थिती नोंदविण्यात आली.


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्ट, तसेच ड्रोन व व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण वेळ निगराणी ठेवण्यात आली. त्यामुळे सर्व केंद्रांवर परीक्षा शांततापूर्ण व पारदर्शक पद्धतीने पार पडली.


पानभोसी केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी


कंधार तालुक्यातील पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय या केंद्रास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. ते पेपर संपेपर्यंत केंद्रावर उपस्थित होते. त्यांच्यासमवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी हे देखील उपस्थित होते.


गैरप्रकारांवर तत्काळ कारवाई

 • नायगाव तालुक्यात नरसी येथील राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांच्या भेटीदरम्यान एक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळला. संबंधितावर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली.

 • माहूर येथील जगदंबा उच्च माध्यमिक विद्यालयात नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी यांनी भेट दिली असता एका विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली.

 • किनवट तालुक्यातील दहेलीतांडा परीक्षा केंद्राबाहेर काही अज्ञात व्यक्ती आढळून आल्याने संबंधितांविरोधात सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


62 अधिकाऱ्यांची थेट उपस्थिती


जीवशास्त्राच्या पेपरसाठी जिल्हास्तरावरील सुमारे 62 अधिकारी हे 62 केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित होते. शिक्षण विभागाचे 7 अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी अशा एकूण 40 अधिकाऱ्यांनी भरारी पथकांमार्फत 109 केंद्रांवर देखरेख ठेवली.


दहावी-बारावीच्या सर्व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होत असून विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित परीक्षा देखील अशाच शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Breaking News

जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र विषयाची परीक्षा आज 109 केंद्रांवर शांततेत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडली