दि. 07 एप्रिल /किनवट
मका पिकाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाने हमीभावाने मका खरेदी करावी व इतर मागण्यांसाठी 20 मार्च रोजी बोधडी येथे शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनात तहसीलदारांच्या वतीने मका खरेदी व इतर मागण्यांबाबत संबंधित विभागांची व शेतकरी संघटनेची संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. शेतकऱ्यांचे मका पीक घरात येऊन पडले तरीही प्रशासन अजून प्रतिसाद देत नाही, म्हणून स्मरण करून द्यायला गेलेला शेतकऱ्यांना ‘हा प्रश्न माझ्या विभागाशी संबंधित नाही, मी यासाठी बांधील नाही’, असे म्हणत तहसीलदाराने हात झटकले. व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी किनवटचे उपविभागीय अधिकारी झेनित चंद्रा दोनतुल्ला यांची भेट घेतली. अत्यंत संवेदनशील पणे त्यांनी हा मुद्दा समजावून घेऊन आंदोलनाची गरज पडणार नाही अशी भूमिका घेतली. तात्काळ नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचेशी फोनवर संवाद साधला व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. जिल्हाधिकारी महोदयांनी शेतकऱ्यांना लगेच आपल्या दालनात बैठकीस बोलावले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांनी शेतकऱ्यांची बैठक घेत तालुक्यातील मका पिकाच्या खरेदी संदर्भात विविध विभागाचा आढावा घेतला. मका खरेदीसाठी शासन अनुकूल असून साठवणुकीसाठी गोडाऊन, खरेदीसाठी मनुष्यबळ, विविध खरेदी एजन्सीची उपलब्धता याबद्दल अहवाल मागवण्यात आला. प्रत्यक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी शनिवारी किनवट तालुक्याचा दौरा करून पाहणी करणार आहेत. किनवट तालुक्यात किती मका असुद्या शासन खरेदी करणार आहे. असे यावेळी पुरवठा अधिकारी म्हणाले. बोगस खरेदी संदर्भात संघटनेने तक्रार केली असता शेतकऱ्यांनी दलालांना आपला सातबारा देऊ नये असे आवाहन यावेळी केले.
किनवट उपविभागीय अधिकारी यांनी दाखवलेली तत्परता व संवेदनशीलता यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची मने जिंकले. 13 तारखेला बोधडी बु. येथे व 15 तारखेला किनवट येथे होणारे रास्ता रोको आंदोलन टळले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी दिली. नांदेड येथे झालेल्या बैठकीत संघटनेच्या वतीने केंद्रीय एम एस पी कमिटीचे सदस्य गुणवंत पाटील हंगरगेकर, शिवाजीराव शिंदे उंचेगांवकर, रमेश कदम पाटील, ज्ञानेश्वर आनकाडे, बाळू मुंडे, बाबु डोंगरे, नारायण भिसे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
