Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी संस्कृतीचे संवर्धन आणि संरक्षण झाले पाहिजे - आ.भीमरावजी केराम


बीड:  आदिवासी संस्कृतीचे संवर्धन आणि संरक्षण झाले पाहिजे असे प्रतिपादन किनवट चे आमदार भीमराव केराम यांनी केले आहे ते बीड येथील एका कार्यक्रमात बोलत होते
.

सध्याचा काळ तंत्रज्ञानाच्या आणि भौतिक विकासाच्या कडेलोटाचा काळ असून दिवसेंदिवस माहिती आणि तंत्रज्ञानाचे विस्फोट होत आहेत. हे मानवी प्रगतीचे सुचिन्ह जरी असले तरी यामुळे मानवी जीवन  काहीअंशी विनाशाकडे वाटचाल करत आहे. याविषयावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.भौतिकप्रगतीच्या अतिरिक्त हव्यासापोटी मानव आपले सुख आणि समाधान कुठेतरी हरवून बसला आहे.या परिस्थितीमध्ये आदिवासी समुदायाचा विचार करूजाता हे लोक आपल्यापेक्षा अधिक सुखी आणि समाधानी आहेत असे दिसते. त्यांच्या सुख आणि  समाधानाचे कारण त्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीमध्ये आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावे लागते असे प्रतिपादन मा.आ.भीमरावजी केराम साहेब यांनी केले .

 आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतीय सामाजिक संशोधन परिषद नवी दिल्ली, आदिवासी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था पुणे यांनी प्रायोजित केलेल्या आणि नवगण शिक्षण संस्था राजुरी नवगणचे  वसंतदादा पाटील महाविद्यालय,पाटोदा यांनी दिनांक 24 व 25 ऑगस्ट  2025 रोजी आयोजित केलेल्या दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,बीड येथे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

 यावेळी दक्षिण अफ्रिका विद्यापीठातील मानववंशशास्त्र व पुरातत्वशास्त्र विभागातील मा.प्रा.डॉ.झोडवा रादेबे, कला व संगीत विभागातील प्रा.डॉ.बोंगानी मखोंझा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे मा.कुलगुरू डॉ.विजय फुलारी, उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मा.चैत्राम पवार, बीडचे जिल्हाधिकारी  विवेक जॉन्सन, मंत्रालयाचे अप्पर सचिव मा.धनराज पाटील,  पीआयटीआय पुण्याचे निवृत्त आयुक्त मा.संभाजी सरकुंडे, निवृत्त पोलिस अधिक्षक मा. मेश्राम साहेब,  नवगण शिक्षण संस्थेचे  अध्यक्ष मा. किशोर काळे, सचिव मा.डॉ.योगेश दादा क्षीरसागर, सहसचिव डॉ.दीपा क्षीरसागर, कार्यकारिणी सदस्य डॉ.सारिका क्षीरसागर,बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी मा.विलास जाधव, बीडचे जिल्हा क्रीडाधिकारी मा.अरविंद विद्यागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आदिवासी संस्कृतीचे संवर्धन आणि संरक्षण झाले पाहिजे.ती काळाची गरज आहे.  नव्या युगातील नव्या तंत्रज्ञानाच्या रेट्यामुळे आणि आधुनिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे दिवसेंदिवस आदिवासी संस्कृती लोप पावत चालली आहे. या संस्कृतीने चित्रकला, शिल्पकला, संगीत, शेती, पर्यावरण संवर्धन,  जल, जमीन, जंगल संवर्धंन अशा कितीतरी मौलिक गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.क्रांतीनायक बिरसा मुंडा यांनी संघर्ष करून आदिवासींचे आत्मभान जागृत केले. आज या चर्चासत्राच्या निमित्ताने आदिवसी समुदायाच्या पुनरूज्जीवनाच्या वाटा पुन्हा नव्याने मोकळ्या होतील असे वाटते. 

 यावेळी बोलताना मा.कुलगुरू डॉ.विजय फुलारी म्हणाले की, भारतातील आदिवासी समुदायाचे प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक असे प्रकार संभवतात. प्रत्येक समुदायाचे स्वतंत्र असे वेगळेपण असून स्वतःची आपली ओळख आहे. शेती, सण, उत्सव, परंपरा, भाषा, खेळ, संगीत अशा नानाविध प्रकारांमध्ये आदिवासी समुदायांनी भारतीय विकासामध्ये आपले अमूल्य योगदान दिले आहे. असे असलेतरी आजही हा समुदाय ग्रामीण दुर्गम भागात जीवन जगत आहे. त्यांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणने  आपणा सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. या चर्चासत्राच्या आयोजनाने या महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातला आहे. 

 यावेळी  दक्षिण अफ्रिका विद्यापीठातील मानववंश व पुरातत्वशास्त्र विभागातील प्रा.डॉ.झोडवा रादेबे यांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले.यावेळी त्यांनी भारतातील आदिवासी समुदायाची आणि संस्कृतीची वैशिष्टये स्पष्ट करत वैश्विक परिप्रेक्ष्यामध्ये भारतीय जनजातींचे वेगळेपण कसे आहे हे पटवून दिले. 

 मुख्य आयोजक म्हणून भूमिका विशद करताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले आदिवासी हे  मूळनिवासी आहेत.भारतीय इतिहासामध्ये आदिवासी समुदायांनी अमुल्य योगदान दिलेले आहे. बीड जिल्हयातही बहुसंख्येने आदिवासी जमाती आढळून येतात. त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश नेऊन त्यांना आपल्याला विकासाच्या मुख्यधारेत आणावयाचे आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावयाचे आहेत. क्रांतीनायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने सबंध भारतामध्ये होत असलेल्या 7 आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांपैकी एक चर्चासत्र आपल्या महाविद्यालयाला घेण्याचा बहुमान मिळाला हे आपले अहोभाग्य आहे. 

 यावेळी मंत्री महोदयाचे अप्पर सचिव मा.धनराज पाटील, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी  आपले मनोगत व्यक्त करून चर्चासत्राच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. 

 कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या स्वागतासाठी गायीलेले स्वागतगीत, आदिवासी संस्कृतीच्या पध्दतीने मोरपिसाचे जिरेटोप लावून केलेले मान्यवरांचे स्वागत,  आदिवासी बांधवांनी केलेले आदिवासी नृत्य हे उद्घाटन सोहळयाचे मुख्य आकर्षण ठरले. या चर्चासत्राचे प्रास्ताविक परिषदेचे मुख्यसमन्वयक डॉ.हमराज उईके यांनी केले.सूत्रसंचालन वृत्तनिवेदक मयुरी सावी यांनी तर आभार प्रदर्शन नवगण शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी  सदस्य मा. डॉ.सारिका क्षीरसागर यांनी केले.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा