माहूर, ता. १५ (वार्ताहर)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आयोजित युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ – २०२५’ अंतर्गत बळीराम पाटील मिशन, मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूरच्या संघाने लोकनृत्य कला प्रकारात तृतीय स्थान पटकावून महाविद्यालयाचा मान वाढविला आहे.
या संघाने सादर केलेल्या आदिवासी नृत्याच्या अप्रतिम सादरीकरणाने परीक्षक व प्रेक्षकांची मनं जिंकली. जल, जमीन, जंगल यांच्या संरक्षणाचा संदेश देणा-या नृत्याच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे सुंदर दर्शन घडविण्यात संघ यशस्वी ठरला.
या विजयी संघात अंबिका मलगाम, सोनाली पेंदोर, विकेश तोडसाम, सुजल मरसकोल्हे, ज्ञानेश्वर खुपसे, दीक्षा मलगाम, पंकज मेश्राम, दिव्या गेडाम यांचा सहभाग होता. प्रा. विजयपाल वाढवे, प्रा. चक्रधर श्रृंगारे, प्रा. शुभम आत्राम, संघव्यवस्थापक म्हणून काम पाहिले तर तुमराम यांची उत्तम कोरिओग्राफीचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या संघाच्या वतीने संघव्यवस्थापिका प्रा. योग्यश्री बिरादार यांनी मा. कुलगुरू डॉ मनोहर चासकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल माहूर परिसरातील आजी माजी विद्यार्थी, नृत्य कलाकार इ.नी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
संघाचे व्यवस्थापक, कोरिओग्राफर तसेच सर्व कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड, सचिव सौ. संध्याताई राठोड, प्राचार्य डॉ. विलास पाटील तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संघाचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
