किनवट (प्रतिनिधी) :
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात आज अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. सामाजिक, शासकीय तसेच राजकीय पातळीवर पत्रकारांना अनेकदा अडचणी, मानसिक छळ, शिवीगाळ, मारहाण अशा अन्यायकारक वागणुकीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी संघटित राहून आपल्या न्यायहक्कासाठी एकजुटीने लढा देणे ही काळाची गरज बनली आहे. या हेतूने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या प्रतिष्ठित संघटनेची किनवट तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
ही कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष रुपेश पडमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदेड जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी नियुक्त करण्यात आली. स्थानिक पत्रकारांच्या एकमुखी मागणीनुसार किनवट तालुक्यातील युवा पत्रकार व सिनेअभिनेते लक्ष्मीकांत मुंडे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर सम्यक सर्पे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय उपाध्यक्षपदी मारोती देवकते आणि विनोद पवार, सहसचिवपदी शौकत शेख आणि बापूराव वावळे, कोषाध्यक्षपदी रुपेश नागरुलवार, सहकोषाध्यक्षपदी अनिल बंगाळे आणि किशोर बोलेनवार, तसेच सदस्यपदी रवींद्र कनाके आणि राहुल एडपल्लीवार यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना नव्याने नियुक्त झालेले तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे म्हणाले,
“गत काही वर्षांत पत्रकारांची होणारी प्रताडणा आणि मानहानी आता सहन केली जाणार नाही. आम्ही समाज आणि सरकार यातील दुवा आहोत — समाजातील समस्या शासनापर्यंत पोहोचवणे आणि शासनाचे निर्णय, योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. या जबाबदाऱ्या पार पाडताना जर कोणी पत्रकारांशी अन्याय केला तर आम्ही एकजुटीने त्याविरोधात आवाज उठवू. संघटनेतील प्रत्येक सदस्याचे प्रश्न हे माझे स्वतःचे प्रश्न असतील, आणि त्यावर न्याय मिळवण्यासाठी आम्ही एकत्र राहू.”
मुंडे यांनी पुढे सांगितले की, पत्रकार संघटना ही केवळ पत्रकारांचा गट नसून एक कुटुंब आहे. सामाजिक प्रश्नांप्रमाणेच पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठीही संघटना सदैव लढेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या नूतन कार्यकारिणीवर किनवट तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, माजी पदाधिकारी, विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि कर्मचारी संघटनांनी हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. पत्रकारांच्या न्याय, सन्मान आणि हक्कासाठी नव्याने निवडलेली ही कार्यकारिणी भक्कम आणि सक्षम नेतृत्वाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास तालुक्यात व्यक्त केला जात आहे.
