किनवट प्रतिनिधी दि.०३ : माजी आमदार स्व. प्रदीप नाईक यांचे खंदे सहकारी आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश (गब्बा) राठोड हे पुन्हा एकदा गोकुंदा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे त्यांनी उमेदवारीची मागणी केली असून, त्यांच्या उमेदवारीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. स्व. आमदार नाईक यांच्या काळात पक्षातील द्वितीय क्रमांकाचे नेते म्हणून गब्बा राठोड यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. नाईक यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत, विद्यमान सदस्य आणि उपाध्यक्ष असतानाही त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवत आदेशाचे पालन केले आणि अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले.
गोकुंदा गटात प्रकाश राठोड यांचा प्रभाव सर्व समाजघटकांमध्ये आहे. त्यांच्या कार्यशैलीत सर्वसमावेशकता आणि तत्परता हे गुण ठळकपणे दिसून येतात.
पोलीस ठाण्यातील एखादा प्रश्न असो, रुग्णालयातील अडचण असो किंवा समाजातील कुणीही संकटात असो — गब्बा मामा नेहमी “पहिल्यांदा धावून येणारे हात” म्हणून ओळखले जातात. याच मानवी दृष्टिकोनामुळे गोकुंदा परिसरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यांना प्रेमाने आणि आदराने “गब्बा मामा” म्हणतात. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अनेक विकासकामांना गती दिली असून, त्यांच्या कार्यकाळातील अनुभव आणि गटातील जातीय समतोल हे त्यांना निवडणुकीत लाभदायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
“जनतेचा विश्वास – गब्बा मामांचा विकास!” “गोकुंदाचा अभिमान – गब्बा मामा महान!” पक्षाने उमेदवारी दिल्यास प्रकाश राठोड हे या गटातून निश्चितच विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी व्यक्त केला आहे.
