मनसेच्या 'घागर मोर्चा'च्या इशाऱ्याने गोकुंदा ग्रामपंचायत प्रशासनाला फुटला घाम!
किनवट (प्रतिनिधी):
गोकुंदा ग्रामपंचायत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाविरुद्ध 'घागर मोर्चा' काढण्याचा आक्रमक इशारा देताच, सुस्त प्रशासन खडबडून जागे झाले. मनसेच्या या 'धडाक्या'नंतर १३ मार्च २०२६ रोजी प्रशासनाने तातडीने प्रभागात नवीन बोअरवेल खोदण्याचे काम हाती घेतले आहे.
नेमके प्रकरण काय?
गोकुंदा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग ६ मध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई निर्माण होते. मात्र, यावर्षी हिवाळ्यातच खासगी बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. या प्रश्नावर मनसेचे शहराध्यक्ष अनिल ईरावार यांनी वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते.
मनसेचा आक्रमक पवित्रा:
प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोहरे यांच्या नेतृत्वाखाली १२ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर 'घागर मोर्चा' काढण्याचा सज्जड इशारा दिला होता. या इशाऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. आंदोलनाच्या भीतीने प्रशासनाने तातडीने हालचाली करत १३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास प्रभागात बोअर खोदण्यास सुरुवात केली. तसेच प्रभागातील इतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यालाही प्राधान्य दिले आहे.
"केवळ आश्वासन नको, कृती हवी!"
यावेळी बोलताना मनसे शहराध्यक्ष अनिल ईरावार म्हणाले की, "गोकुंदा ग्रामपंचायत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. केवळ आश्वासने देऊन जनतेची बोळवण खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने वेळेत कामे करावीत, अन्यथा यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी 'मनसे स्टाईल'ने तीव्र आंदोलन छेडले जाईल."
मनसेच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे आणि बोअरवेलचे काम सुरू झाल्याने प्रभाग ६ मधील महिला व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पाण्यासाठी होणारी त्यांची पायपीट आता थांबणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले जात आहेत.
संपादक: आनंद भालेराव
किनवट टुडे न्यूज, किनवट-नांदेड.
