किनवट (प्रतिनिधी) दि. १८ : मौजे चिखली (बु.) ता. किनवट, जि. नांदेड येथील उपआरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे व बोगस पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थ शेख शराफत शेख इसार यांनी मा. उपविभागीय अधिकारी, किनवट यांचेकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
अर्जात नमूद केल्याप्रमाणे, सदर बांधकामात सिमेंट व रेतीमध्ये माती मिसळून वापर होत आहे. काम अंदाजपत्रकाप्रमाणे न करता गैरप्रकाराने सुरू असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. याबाबत ग्रामस्थांनी विचारणा केल्यावर काम पाहणाऱ्या संबंधितांनी उलटसुलट भाषा वापरून चुकीची माहिती दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढील मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत :
१) चिखली बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुरुस्तीचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेले असूनही पुन्हा बांधकाम हाती घेण्यात आले आहे.
२) सदर इमारत चुकीच्या पद्धतीने जमीनदोस्त करण्यात आली असून ती योग्य प्रकारे पृष्ठ नव्हती.
३) जुनी इमारत पाडण्यासाठी संबंधित कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही.
४) ग्रामपंचायतीकडून नाहरकत प्रमाणपत्र (NOC) न घेता इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रकारातून बांधकामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून काम करणाऱ्या यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अर्जदार शेख शराफत शेख इसार यांनी केली आहे.
सदर अर्ज दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवक-जावक शाखेत दाखल झाला असून, या तक्रारीवर पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
