श्रीक्षेत्र माहूर
दरवर्षीप्रमाणे दिवाळी निमित्त शिक्षक व विद्यार्थी यांना २१ दिवसांच्या सुट्ट्या देण्याची पद्धत कायम असून,यंदा मात्र शिक्षण विभागाने केवळ १५ दिवसांच्या सुट्ट्या जाहीर केल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने दिवाळीच्या सुट्ट्या वाढवून २१ दिवस करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष शेषराव पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माहूर तालुकाध्यक्ष शेषराव पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, “दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा आणि कौटुंबिक सण आहे. या काळात शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाऊन सण साजरा करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी दरवर्षी २१ दिवसांच्या सुट्ट्या देण्याची परंपरा आहे. मात्र यंदा केवळ १५ दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असून, ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अनेक शिक्षक दूरवरच्या भागात कार्यरत असल्याने त्यांना प्रवासासाठी अतिरिक्त दिवसांची आवश्यकता असते. त्यामुळे शासनाने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन पारंपरिक पद्धतीप्रमाणेच दिवाळीच्या सुट्ट्या वाढवून २१ दिवस कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हास्तरीय प्रतिनिधींनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे या मागणीचे निवेदन दिले आहे.दरवर्षीप्रमाणेच यंदाही शिक्षक आणि विद्यार्थी दिवाळीच्या उत्साहात सहभागी होऊ शकतील, यासाठी सुट्ट्यांबाबतचा निर्णय सकारात्मक घ्यावा, अशी अपेक्षा सर्व शिक्षकवर्गातून व्यक्त केली जात आहे.
