Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे पोलिसांवर गुन्हे दाखल करून डिवायएसपीला सह आरोपी करा ; रेल्वे स्टेशन परिसरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निदर्शने

 (विद्यार्थ्यास हातकडी लावून फोन पे द्वारे पैसे घेतल्याचे प्रकरण, तपास अधिकाऱ्यांनी अहवाल बदलून प्रकरण निकाली काढले)


नांदेड : मजदूर युनियनचा कार्यकर्ता तथा माकपचा सभासद असलेल्या मंगेश या विद्यार्थ्यास रेल्वे पोलिसांनी बेकायदेशीररित्या अटक करून, हातात हातकडी लावून पाच तास डांबून ठेवले होते. रात्री ३ वाजता फोन पे द्वारे ५ हजार रुपये बळजबरीने इतर खाजगी व्यक्तीच्या नावावर वळवून घेत सोडून दिले होते. मंगेश वट्टेवाड हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून अर्धवेळ काम करून शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे घटना घडली तेव्हा तो नांदेड रेल्वे स्टेशन येथे वाटरिंगचे काम करीत होता. मोटारसायकल पार्किंग मध्ये लावण्याच्या कारणावरून त्याला जातीवाचक शिवीगाळ करीत अपमानित करून पाच तास हातकडी लावून पेटीला बांधून ठेवले होते. त्या पीडित विद्यार्थ्यांने नांदेडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वजीरबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, लोहमार्गचे पोलीस अधिकारी, डीआरएम आदीना निवेदने देऊन गुन्हेगार पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तीन आंदोलनात दोषींवर कारवाई करून अटक करण्याची व सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी देखील करण्यात आली. आज घडीला देखील पीडित विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषण करीत आहे.

मागील सहा महिन्यापासून कारवाईसाठी टाहो फोडत आहे.

दोन वेळा लेखी जबाब दिला. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. पोलीस उप विभागीय अधिकारी (लोहमार्ग) श्री संजय लोहकरे यांनी गुन्हेगारांना वाचविण्यासाठी खोटा तपासणी अहवाल तयार करून प्रकरण निकाली काढले असल्याचे घोषित केले आहे. एकंदरीत तक्रारीत नमूद ३-४ पोलीस कर्मचारी राजरोसपने लूटमार करतात अशी जोरदार चर्चा असून यातील एक पोलीस कर्मचारी जबरी चोरीच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगत आहे.


या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी खोटा अहवाल तयार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना सह अरोपी करावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व पीडित विदयार्थ्यांनी केली आहे. ज्याच्या फोनपे वर मध्यरात्री ३ वाजता ५ हजार रुपये बळजबरीने वळवून घेतले आहेत तो खाजगी व्यक्ती फिर्यादी व पीडित विद्यार्थी मंगेश चा मित्र असल्याचे डिवायएसपी श्री लोहकरे यांनी आपल्या अहवालात सुस्पष्ट लिहले असून फिर्यादी त्यास कसल्याही प्रकारे ओळखत नाही.

 या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी. संबंधित आरोपी पोलीस कर्मचारी, तपास अधिकारी श्री लोहकरे यांची ब्रेनमॅपिंग चाचणी करावी आणि प्रकरण भापोसे दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देऊन पुन्हा तपास करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करावी ही मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या कडे व त्यांच्या मार्फत राज्य आणि केंद्र सरकार कडे करण्यात आली आहे.

उपरोक्त प्रकरणी कायदेशीर कार्यवाही करावी म्हणून माकप च्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी नांदेड रेल्वे स्टेशन पोलीस ठाणे समोर निदर्शने करण्याची रीतसर नोटीस दिली असता.

पोलीस निरीक्षक श्री प्रकाश वाघमारे यांनी माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड आणि पीडित विद्यार्थी कॉ.मंगेश वट्टेवाड यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये बीएनएसएस १६८ अंतर्गत नोटीस दिली व रेल्वे स्टेशन येथील पोलीस स्टेशन परिसरात निदर्शने आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. शिवाय रेल्वे सार्वजनिक मालमतेचे तसेच प्रवासी व त्यांच्या समानाच्या सुरक्षेत बाधा निर्माण होण्याची आणि रेल्वेची हानी व नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने निदर्शने करण्यास परवानगी नाकरण्यात येत असल्याचे लेखी कळविले आहे.रेल्वे गाड्यांच्या आगमनात व प्रवाश्यास बाधा निर्माण झाल्यास किंवा रेल्वे प्रवाश्याच्या जीवितास धोका झाल्यास किंवा इतर संज्ञय अपराध घडल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील व आपल्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे नोटीस द्वारे कळविले आहे.

नांदेड रेल्वे स्टेशन येथे प्रवास्यांना लुटणारी मोठी टोळी कार्यरत असून या टोळीमध्ये काही निवडक पोलीस कर्मचारी सामील आहेत असा संशय बळावला आहे.

त्यामुळे या विद्यार्थी हातकडी व फोनपे द्वारे लूट प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी मागणी घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी मैदानात उतरली असून दि. २१ नोव्हेंबर रोजी दोन वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथे तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत.निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनाच्या प्रति रेल्वेच्या महानिदेशकांना, मुख्यमंत्री व छत्रपती संभाजी नगर रेल्वे पोलीस अधीक्षक पाठविल्या आहेत.

या आंदोलनाचे नेतृत्व माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड, पीडित विद्यार्थी कॉ.मंगेश वट्टेवाड, कॉ. लता गायकवाड, कॉ.दिगंबर घायाळे,कॉ.बालाजी पाटील भोसले,सुनील भाऊ अंनतवार,कॉ. सुभाषचंद्र गजभारे, कॉ. अंबादास भंडारे,कॉ. राहुल नरवाडे, कॉ. प्रयागबाई लोखंडे आदींनी केले.

Breaking News

रेल्वे पोलिसांवर गुन्हे दाखल करून डिवायएसपीला सह आरोपी करा ;  रेल्वे स्टेशन परिसरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निदर्शने