नगरपंचायतच्या विरोधात पत्रकारांची पोलिसात तक्रार निषेधाचे तहसीलदारांना निवेदन
श्रीक्षेत्र माहूर
माहूर नगर पंचायतकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीसीमुळे शहरात मोठा वाद निर्माण झाला असून, या नोटीसीमध्ये स्थानिक पत्रकार व वृत्तपत्रांची नावे वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पत्रकारांची सामाजिक व व्यावसायिक बदनामी झाल्याचा तसेच व्यापाऱ्यांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष धमक्या मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी पत्रकार विजय आमले व इलियास बावाणी यांनी माहूर पोलीस ठाण्यात नगर पंचायतचे मुख्याधिकारी व नगर अभियंता यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, नगर पंचायत माहूरने शहरातील व्यापाऱ्यांना दिलेल्या अतिक्रमणविषयक नोटीसीमध्ये पत्रकारांची व त्यांच्या वृत्तपत्रांची नावे नमूद करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊन त्याचा थेट फटका संबंधित पत्रकारांना बसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पत्रकार इलियास बावाणी हे माहूर शहरातील रहिवासी असून त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडण्याचे काम करीत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील स्वच्छता व नाली बांधकामासंदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती; मात्र अतिक्रमण काढण्यासंदर्भात कोणत्याही बातमीत पत्रकारांचा थेट सहभाग किंवा उल्लेख नव्हता.
असे असतानाही नगर पंचायत प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटीसीत पत्रकारांची नावे वापरल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. अनेक व्यापाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून पत्रकार विजय आमले व इलियास बावाणी यांना जाब विचारला असून, “तुम्ही हे चुकीचे केले आहे,” असे म्हणत धमक्याही दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित व्यापारी हे पत्रकारांच्या वॉर्डातील असल्याने आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, या संपूर्ण प्रकारामुळे पत्रकार व त्यांच्या वृत्तपत्रांची प्रतिमा मलिन झाली असून, सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे ते मानसिक तणावाखाली आहेत. त्यांच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नगर पंचायतकडून संबंधित दिवशी चौकातील सर्व व्यापाऱ्यांना कायदेशीर प्रक्रियेनुसार नोटीसी देऊन कागदपत्रांची मागणी करण्यात आली असून अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रक्रियेत पत्रकारांची नावे वापरणे हे अत्यंत आक्षेपार्ह व चुकीचे असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
या घटनेमुळे नगर पंचायतच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पत्रकारांच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत पत्रकारितेच्या स्वतंत्र्याला ही बाब घातक आहे संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटना व सजग नागरिकांकडून करण्यात येत असून याप्रकरणी पत्रकार न्यायालयातही दाद मागणार असल्याचे कळत आहे
या निवेदनावर अपील बेलखोडे, इलियास बावाणी, वसंत कपाटे, विजय आमले, नंदकुमार जोशी, गोपाल खापर्डे, दत्तात्रय शेरेकर, संजय बनसोडे, गजानन कुलकर्णी, सय्यद किरमाणी, कुंदन तिवडकर, राम दातीर रफिक भाई पवन कोंडे, शंकर भालेराव, गोपाल नाईक व फिरोज पठाण आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
