श्रीक्षेत्र माहूर
माहूर येथील ज्येष्ठ व सातत्याने लिखाण करणारे पत्रकार वसंत कपाटे यांची दैनिक समीक्षा कर्तुत्व पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्काराचे वितरण दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेड येथील मिनी सह्याद्री सभागृहात मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक तथा दैनिक समीक्षा चे मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
मीमांसा फाउंडेशन, दैनिक समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व पत्रकार प्रेस परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकार व मान्यवरांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात येतो. पत्रकारितेतील निष्ठा, सातत्य, सामाजिक भान आणि जनहितासाठी केलेल्या कार्याला प्रोत्साहन मिळावे, तसेच नव्या पिढीतील पत्रकारांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विविध पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात येतो.
ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे हे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक समस्या, जनहिताच्या विषयांवर सातत्याने निर्भीड व वस्तुनिष्ठ लेखन करत आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी आपल्या लेखणीतून केले असून त्यांच्या लिखाणामुळे अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. पत्रकारितेतील त्यांचे योगदान, प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास पत्रकारिता, साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, वरिष्ठ पत्रकार, संपादक तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. वसंत कपाटे यांच्या या सन्मानाबद्दल माहूर तालुक्यातून तसेच पत्रकार बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे.
