किनवट (नांदेड): किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक (PI) गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. २१) 'मास रेड' मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शहरात व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून मटका जुगार आणि अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एकूण ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१. मटका जुगारावर दोन ठिकाणी कारवाई
शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.
पहिली कारवाई (घोटी परिसर): फिर्यादी पोलीस अंमलदार सदाशिव अनंतवार (PC 3209) यांच्या तक्रारीवरून विठ्ठल खंडू गीमेकर (वय ५२, रा. घोटी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ८५० रुपये रोख आणि मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या, पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई (कोठारी परिसर): फिर्यादी पोलीस अंमलदार बाळू कुडमेते (PC 24) यांच्या तक्रारीवरून देवराव सोनबा बोरकर (वय ५८, रा. कोठारी) याच्यावर कारवाई करण्यात आली. आरोपी 'टाईम ओपन' नावाचा मटका खेळवत असताना त्याच्याकडून १०५० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस हवालदार सीरमनवार (HC 2190) करत आहेत.
२. अवैध गावठी दारू विक्रीवर कारवाई
दारूबंदी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरही जरब बसवली आहे.
बोधडी परिसर: पोलीस शिपाई संजय राजने (ब.नं. ८१७) यांच्या फिर्यादीवरून इलवंत महादू मुरमुरे (वय ५३, रा. बोधडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून ४० लिटर गावठी हातभट्टीची दारू (दोन प्लास्टिक कॅनमध्ये) जप्त करण्यात आली, ज्याची अंदाजे किंमत ४,००० रुपये आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार वाघमारे (HC 2547) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या आदेशानुसार किनवट पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी ही मोहीम फत्ते केली. एकाच दिवशी ४ गुन्हे दाखल झाल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढील काळातही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
---संपादक आनंद भालेराव किनवट टुडे न्युज, किनवट-नांदेड
