तळा : श्री गो म वेदक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयास शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत बाह्य मूल्यांकनात अ + श्रेणी प्राप्त करून राज्यातील गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्थेमध्ये शाळेने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार सन २०२४- २०२५ मध्ये राज्यातील १,०२६७५ शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले. स्वयं मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळापैकी सन २०२५-२०२६ मध्ये १०,७७२ शाळांची बाह्य मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली होती त्यापैकी १०,६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण झाले. या प्रक्रियेत राज्यातील ४२९ शाळा व रायगड जिल्ह्यातील १० शाळांना अ+ श्रेणी प्राप्त झाली असून त्यामध्ये गो म वेदक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जिल्ह्यातील एक शैक्षणिक दृष्ट्या नामवंत शाळा ठरली आहे. गो म वेदक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरओचे पाणी, स्मार्ट बोर्डद्वारे अध्यापन, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, विविध सराव परीक्षांचे आयोजन, विविध परीक्षेसंबंधी समुपदेशन यासारखे उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.
या उपक्रमांचे फलित म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर कला, क्रीडा, विज्ञान प्रदर्शन, निबंध, वक्तृत्व आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. व्यक्तिमत्त्व विकास, नैतिक शिक्षण आणि पर्यावरण जनजागृती यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाली आहे.
उच्चविद्याविभूषित शिक्षक वर्ग व गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक वातावरण यामुळेच गो म वेदक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयास अ + श्रेणी प्राप्त झाली आहे. या यशाबद्दल तळाचे गटविकास अधिकारी श्री महादेव शिंदे, नायब तहसीलदार श्री पालांडे, गटशिक्षणाधिकारी सौ सुरेखा तांबट, केंद्रप्रमुख श्री वासकर सर, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री अनंत जोशी, श्री नंदकुमार वेदक, श्री मारुती शिर्के, अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, उपाध्यक्ष तथा वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री महेंद्रशेठ कजबजे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री महादेव बैकर, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री बी के पटेल, खजिनदार श्री चंद्रकांत रोडे, कार्यकारिणी सदस्य श्री दिपक कोटिया, डॉ श्रीनिवास वेदक, डॉ सतीश वडके, ॲड कौस्तुभ धामणकर, विशेष निमंत्रित सदस्य श्री दत्तात्र्यय सप्रे, श्री चंद्रकांत खातू, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे, SQAAF समितीचे सर्व सदस्य, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या प्रगतीत संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे.
