किनवट (प्रतिनिधी): येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्र नवरात्र महोत्सव व श्री रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे शुक्रवार दिनांक २० मार्च ते गुरुवार २६ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित केलेली भव्य श्री रामकथा हा सोहळा असणार आहे. श्रीराम मंदिर रामनगर किनवट येथे दररोज सायंकाळी ७:०० ते रात्री ९:०० या वेळेत सुप्रसिद्ध कथावाचक प्रा. तपनकुमार मिश्रा आपल्या रसाळ वाणीतून श्रीरामचरितमानावर आधारित प्रभू श्रीरामांच्या पावन जीवनचरित्राचे दर्शन घडवणार आहेत. भक्ती आणि सत्संगाच्या या सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
या महोत्सवाचा मुख्य सोहळा गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ रोजी रामनवमीच्या दिवशी संपन्न होणार आहे. या दिवशी पहाटे ५:०० वाजता महाअभिषेक व पूजन करण्यात येईल त्यानंतर सकाळी ७:०० वाजता सामूहिक आरतीचा कार्यक्रम होईल. सकाळी ९:०० वाजता शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार असून दुपारी १२:०० वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. जन्मोत्सवानंतर दुपारी १:०० वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी ४:०० वाजता प्रभू श्रीरामांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या या आध्यात्मिक सोहळ्यात सर्व भाविक भक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शनाचा व श्रीरामकथेचा अमृतमय लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान, किनवट च्या वतीने करण्यात आले आहे .
